अवघ्या १३ मिनिटांत कोरोना चाचणी अहवाल

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना चाचणीची नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विमानतळाबाहेर येताच प्रवाशी कोरोना चाचणी करून अवघ्या १३ मिनिटांत त्याचा अहवाल घेऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळही वाचणार आहे.

एका आंतरराष्ट्रीय खासगी कंपनीच्या मदतीने ही सुविधा विमानतळावर देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीची सुविधाही आहे. परंतु त्याचा अहवाल येण्यासाठी ६ ते ८ तास लागतात.

अहवाल येईपर्यंत अनेकांना धाकधूक लागून राहते. तसंच, वेळही वाया जातो. जलद गतीने कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल प्राप्त होईल, अशी सुविधा देण्याचा निर्णय मुंबई विमानतळ प्रशासनाने घेतला.

त्यानुसार १५ डिसेंबरपासून ही सेवा ‘बी’ गेट जवळ लेव्हल-२ समोरच देण्यात आली आहे. या चाचणीसाठी प्रवाशांना मात्र ४ हजार ५०० रुपये मोजावे लागतील. प्रत्येक दिवशी ३० ते ३५ चाचण्या होत असून २८ डिसेंबपर्यंत ४०० प्रवाशांनी या चाचणीचा फायदा घेतल्याची माहिती देण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या