लोकल सेवेमुळं कोरोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू

सर्वसामान्य प्रवाशांसाठी १० महिन्यांनी १ फेब्रुवारीपासून  लोकल सेवा सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मोठी कोरोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. तसेच खासगी कार्यालयांना ५० टक्के उपस्थितीची अटही घालण्यात आली आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा बंद करण्यात आली. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी लोकलसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र सर्वसामान्यांना, खासगी क्षेत्रातील पुरुषवर्गाला अद्यापही लोकलने प्रवासाची मुभा नव्हती.

सोमवारपासून सर्वसामान्यांनाही ठरावीक वेळेत लोकलने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सोमवारपासून प्रवाशांची संख्या व गर्दी वाढू लागणार आहे. मागील १० महिन्यांत महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आणण्यात यश आले आहे. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाल्यावर रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईतील ६ मोठी कोरोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

दहिसर, गोरेगाव नेस्को, बीकेसी, वरळी एनएससीआय, मुलुंड, भायखळा येथील रिर्चड सन्स अँड कंपनीतील केंद्र अशी सहा करोना उपचार केंद्रे ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सुरू केल्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढण्याचीही शक्यता आहे. मात्र या कार्यालयांना व खासगी आस्थापनांना एकावेळी ५० टक्के उपस्थिती राहील, याच पद्धतीने नियोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या