मुंबईत पुन्हा कोरोना लसीकरण मोहीम

मुंबईसह राज्यात मंगळवारपासून पुन्हा कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केलं जातं आहे.  मुंबईत लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी कोविनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लसीकरण दोन दिवस स्थगित करण्यात आलं होतं. पण आता मुंबईत स्थगित झालेला लसीकरण कार्यक्रम १९ जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहे.

कोविन अॅप अद्यापही सुरळीत झालेलं नाही पण उद्यापासून कोरोना लस दिली जाणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मुंबईत चार दिवस लसीकरण कार्यक्रम असेल. मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार लस दिली जाईल. मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज ४००० जणांना लस देण्यात येईल. अशी माहिती देण्यात आली आहे.

मुंबईतील ९ आणि राज्यातील २८५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. राज्यात आठवड्यातील ४ दिवस लसीकरण सुरू राहणार आहे. आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी होणाऱ्या कोरोना लसीकरणाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

लसीकरणानंतर मुंबईत २ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका व्यक्तीला लो ब्लड प्रेशर तर दुसऱ्याला इतर समस्या उद्भवू लागली. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  शिवाय किरकोळ स्वरूपाच्या २०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. यामध्ये ताप येणं, अंगदुखी आणि अंगावर साधं पुरळ अशा समस्या उद्भवल्या आहेत. आतापर्यंत कुणालाही गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम झालेले नाहीत, अशी माहितीही प्रशासनानं दिली आहे.


हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे


पुढील बातमी
इतर बातम्या