नवी मुंबई पालिका रुग्णालयांत २४ तास लसीकरण

नवी मुंबईत सध्या १८ केंद्रांवर कोरोना लसीकरण केलं जात आहे. आठवडाभरात ही संख्या वाढवून ३२ करण्यात येणार आहे. तर ११ मार्चपासून पालिकेच्या तीनही रुग्णालयांत २४ तास लसीकरण करण्यात येणार आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ही माहिती दिली आहे. 

नवी मुंबईत १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ९ मार्चपर्यंत ३३ हजार ६९ जणांना लस देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार सध्या वाशी, नेरुळ  व ऐरोली या तीन महानगरपालिका रुग्णालयांसह शहरातील ११ खासगी रुग्णालयांमध्ये आठवडय़ातील सहा दिवस तसेच पालिकेच्या ४ आरोग्य केंद्रांवर सोमवार, बुधवार   शुक्रवार असे तीन दिवस लसीकरण करण्यात येत आहे. 

बुधवारपासून लसीकरणासाठी प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सीबीडी, करावे, कुकशेत, शिरवणे, जुहूगांव, घणसोली, ऐरोली, दिघा व इलठणपाडा या ९ केंद्रांत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे २७ लसीकरण केंद्र शहरात सुरू होणार आहेत. त्यात आणखी वाढ करीत शुक्रवारपर्यंत ३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत. 

लसीकरणाला गती मिळावी व जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी लसीकरण केंद्रांत वाढ करण्याबरोबर आता पालिका प्रशासनाने वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही सार्वजनिक रुग्णालयांतील लसीकरण सेवा ११ मार्चपासून २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना कामाच्या वेळांमुळे दिवसभरात वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली असून बुधवारपासून ती सुरू होणार आहे. गुरुवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी असूनही लसीकरण सुरू  राहणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या