लवकरच कोव्हॅक्सिन केंद्रांवर कोविशिल्ड लसीचा पर्याय

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहेत. या वाढत्या रुग्णांमुळं राज्य सरकारनं जनतेला ८ दिवसांचा कालवधी दिला असून, रुग्णसंख्या आणखी वाढल्यास लॉकडाऊनबाबत विचार केला जाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथं कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे, त्या केंद्रावर लवकरच कोविशिल्ड लसीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मिळणारा कमी प्रतिसाद पाहता आरोग्य विभागानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं लवकरच राज्यातील २३ जिल्हा रुग्णालय आणि ४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दोन्ही लसींचा पर्याय उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनानं लसीकरण प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीविषयी निवड करण्याचा हक्क नसेल असा निर्णय घेतला होता; मात्र आता या निर्णयात बदल करून दोन्ही लसींचा पर्याय उपलब्ध असेल.

जे. जे. रुग्णालयात सिरमच्या कोविशिल्ड लसीचा हजार डोसचा साठा उपलब्ध झाला आहे. हे डोस येत्या आठवड्यापासून वापरण्यात येणार असल्याचं समजतं. सोमवार ते गुरुवार कोव्हॅक्सिनसाठी तर शुक्रवार- शनिवार कोविशिल्ड लसीसाठी राखून ठेवण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनानं घेतला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या