मुंबईतले ‘हे’ ४ वाॅर्ड अतिधाेकादायक, जपून राहण्याचा प्रशासनाचा सल्ला

कोरोनाला (coronavirus) रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतानाही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने राज्य सरकारची डोकेदुखीही वाढली आहे. खासकरून मुंबईत कोरोनाची साखळी वेगाने पसरत असल्याचं दिसून येत आहे. आधी केवळ परेदशातून आलेल्या तसंच त्यांच्या संपर्कात आलेल्यांपुरताच मर्यादीत असलेला कोरोना आता झोपडपट्ट्यांमध्येही (slum) शिरकाव करू लागला आहे. काही ठिकाणी तर कोरोनाचे रुग्ण दर दिवसागणिक सापडत आहेत. या दृष्टिकोनातून मुंबईतील ४ वाॅर्ड अतिधोकादायक मानण्यात आले आहेत. 

२४३ परिसर सील

महाराष्ट्रात सद्यस्थितीत ८६८ कोरोनाबाधित (corona patient) रुग्ण आढळले असून त्यातील ५२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक ५२५ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. ठिकठिकाणी कोरोनाबाधीत रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाकडून संबंधित परिसर सील करून ठेवण्यात येत आहे. मुंबईमध्ये सद्यस्थितीत २४३ परिसर सील करण्यात आले आहे. सील करण्यात आलेल्या परिसरातील रहिवाशांना आत जाण्यास किंवा बाहेर येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे.

धोक्याचे भाग

ज्या भागांत ४० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, हे भाग हाॅटस्पाॅट अर्थात अतिधोकादायक भाग म्हणून ठरवण्यात आले आहेत. मुंबईत असे ४ वाॅर्ड आहेत, जिथं ४० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हे वाॅर्ड आता अतिधोकादायक बनले आहेत. त्यामुळे या भागांत जाणं धोक्याचं ठरू शकतं. 

यांचा समावेश

या ४ वाॅर्डांमध्ये जी दक्षिण, ई, डी आणि के वेस्ट असे वाॅर्ड येतात. जी दक्षिण वाॅर्डात वरळी कोळीवाडा, प्रभादेवी या भागांचा समावेश होतो. या भागांत आतापर्यंत ७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. ई वॉर्डमध्ये भायखळाचा समावेश होत असून या परिसरात ४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. डी वाॅर्ड म्हणजेच ताडदेव परिसरात ४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर के वेस्ट वाॅर्ड म्हणजेत अंधेरी पश्चिम परिसरात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे या परिसरातील रहिवाशांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसने झोपडपट्ट्यांमध्येही शिरकाव केला असून धारावीमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. धारावीमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ७ वर वर जाऊन पोहोचली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या