Coronavirus update: कोरोनाग्रस्तांचा आकडा १२७ वर, १५ जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १२७ वर जाऊन पोहचल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यांतील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी १ रुग्ण असे एकूण २ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२७ वर गेली आहे. 

यापैकी १५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याचंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये महाराष्ट्रातील पहिला कोरोना रुग्ण अशी नोंदणी झालेल्या दाम्पत्याचा देखील समावेश आहे. या दाम्पत्याला बुधवारी पुण्यातील नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  

दरम्यान, राज्यात २१ दिवसांसाठी संचारबंदी (curfew) असली तरी, जनतेला दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावं.  स्वयंसेवी संस्था, समाजाने पुढं येऊन शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या