नवी मुंबईत ११ लाख नागरिकांचं लसीकरण

ऑगस्ट महिन्यात नवी मुंबईत पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे 8 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट या कालावधीत 1 लाख 5 हजार 476 नागरिकांना लसीचा पहिला डोस तर 66 हजार 642 नागरिकांना  लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. 

जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करून त्यांना संरक्षित करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेमार्फत 91 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. लसीच्या उपलब्धतेनुसार दैनंदिन लसीकरणाचे योग्य नियोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना त्यांच्या घरापासून जवळच लस घेणे सुविधाजनक व्हावे व लसीकरणाला वेग देण्यासाठी अधिक लससाठा उपलब्ध झाल्यास शंभरहून अधिक लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची लसीकरण केंद्रे व खाजगी रूग्णालयांतील केंद्रे याठिकाणी आतापर्यंत 8 लाख 7 हजार 415 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 3 लाख 4 हजार 155 नागरिक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. लसीचे एकूण 11 लाख 11 हजार 570 डोस नागरिकांना देण्यात आलेले आहेत. म्हणजेच 76 टक्के नागरिकांनी पहिला डोस तसंच 28 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. लसीकरणाचे हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत अधिक आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे याकरिता नवी मुंबई महानगरपालिका प्रयत्नशील आहे. लस उपलब्ध होईल त्यानुसार ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस उपलब्ध करून देण्याची काळजी घेतली जात आहे.  तसेच 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. या महिन्यात पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने 30 वर्षावरील नागरिकांकरिता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या