मुंबईत डेल्टा प्लसचे १२८ रुग्ण

मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात कार्यरत झालेल्या पहिल्या जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) प्रयोगशाळेतून पहिल्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. क्रमनिर्धारण प्रयोगशाळेत १८८ नमुन्यांची चाचणी केली आहे.  यामध्ये १२८ रुग्ण डेल्टा प्लस व्हेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे. उर्वरीत नमुन्यांमध्ये अल्फा व्हेरिएंटचे दोन, कप्पा व्हेरिएंटचे २४, तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण कोरोनाबाधित असल्याचं दिसून आलं आहे

‘जिनोम सिक्वेसिंग’ची पहिली प्रयोगशाळा कस्तुरबामध्ये ४ ऑगस्टपासून सुरू झाली असून यात दोन यंत्रे आहेत. एकाचवेळी ३८४ चाचण्या करण्याची क्षमता आहे. या यंत्रामध्ये पहिली चाचणी नुकतीच करण्यात आली. यात १८८ नमुन्यांची चाचणी केली गेली. चाचण्यांचे अहवाल पालिकेने जाहीर केले.

पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितलं की, जनुकीय चाचणी ही करोनाची सामान्य चाचणी नाही. सगळ्या रुग्णांची जनुकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. खूप दिवस रुग्णालयात दाखल असेलेले, परदेशातून आलेले करोनाबाधित प्रवासी यांचे नमुने घेतले होते. त्याचबरोबर एखाद्या इमारतीत किंवा वसाहतीत एकाच वेळी अनेक रुग्ण आढळून आले तर अशा ठिकाणचे नमुनेही पाठवले होते.

डेल्टाचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात घेता करोना प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यांसारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या