मनोरूग्णालयांकडे सकारात्मकतेनं पाहणं गरजेचं - आरोग्यमंत्री

सध्या सगळीकडे दिवाळीची धूम आहे. याच निमित्ताने मानसिक रुग्णांनी काही वस्तू बनवल्या आहेत. या वस्तूंचं प्रदर्शन सोमवारी मंत्रालयात भरवण्यात आलं आहे. आरोग्य विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा मुंबई मंडळ, ठाणे आणि प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे यांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.

या प्रदर्शनात मनोरूग्णांनी तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तूंचे वीस स्टॉल्स लावण्यात आले आहेत. यामध्ये पेपर बॅग, फाईल्स, पुष्प गुच्छ, आकाश कंदील, पणत्या, दागिने, पेंटींग, पेपर प्लेट्स इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. यात ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयाचे १६, पुणे आणि रत्नागिरी रूग्णालयातील रूग्णांचे प्रत्येकी दोन स्टॉल लावण्यात आले आहेत. यासह मानसिक तणाव, त्याचे परिणाम, लक्षणे, काळजी यावर जनजागृती करण्यासाठी या ठिकाणी विविध पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.

मनोरूग्णांकडून एकाग्रतेने आकर्षक वस्तू बनवून त्यांचं प्रदर्शन भरवणं ही उल्लेखनीय बाब आहे. मनोरूग्णालय बदलत असून लोकांनी आता त्यांच्याकडे सकारात्मक भावनेने बघणं आवश्यक आहे. तसंच अशा प्रकारचे उपक्रम अत्यावश्यक आहेत. जिल्हास्तरावरही असे उपक्रम भरवावेत.

डॉ. दीपक सावंत, आरोग्यमंत्री

कौशल्य विकासासह उपचार

मनोरूग्णांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे, आवडीप्रमाणे काम देऊन विविध वस्तूंची निर्मिती केली जाते. यामुळे त्यांच्यातील कौशल्याचा विकास तर होतोच, पण त्यांचे मानसिक स्वास्थ ठीक होण्यास मदत होते. शिवाय याचा परिणाम म्हणजे रूग्ण बरे होण्यास मदत होते. अनेक रूग्णालयांमध्ये फाईल्स, स्टेशनरी बनवण्याचे काम केले जाते. यामुळे रूग्णांच्या मानसिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते.


हेही वाचा

स्वस्तातली मिठाई पडू शकते महागात!

पुढील बातमी
इतर बातम्या