नवी मुंबईत साडेपाच लाख कोरोना चाचण्या

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रोज नवे रुग्ण ३७ पर्यंत खाली आले होते. आता १०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. उपचाराधीन रुग्णही एक हजारापेक्षा अधिक झाले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने कोरोना चाचण्या वाढवल्या आहेत. 

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने ११ महिन्यात ५ लाख ३६ हजार ७५८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात २४ हजार कोरोनायोद्धांना लस देण्यात आली आहे.

नवी मुंबईत सोमवारपासून रोज कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा अधिक आहे. बुधवारी १३० तर गुरुवारी १२२ करोना रुग्ण शहरात सापडले आहेत. कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याने पालिका प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली आहे. तर कोरोना चाचण्याही वाढविण्यात आल्या आहेत.

पालिकेने प्रतिजन व आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यावर भर दिला. पालिका आयुक्तांनी जास्तीत जास्त संशयीत नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिवसाला तीन ते साडेतीन हजार करोना चाचण्या करण्यात येत होत्या. 

गेल्या ११ महिन्यात ५ लाख ३६ हजार ७५८ नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआर चाचण्या २ लाख ३८ हजार ६८० तर प्रतिजन चाचण्या या २ लाख ९८ हजार ०७८ करण्यात आल्या आहेत. शहराची लोकसंख्या १५ लाख असून त्या तुलनेत आतापर्यंत ३६ टक्के नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. अधिक चाचण्या करण्याचे पालिकेचे लक्ष आहे. 

नवी मुंबई शहरात पहिल्या टप्प्यात एकूण ३१ हजार १७० जणांची लसीकरणासाठी ‘अ‍ॅप’वर नोंदणी करण्यात आली होती. त्यातील २४ हजार ०१० जणांचे म्हणजेच ७७ टक्के जणांचे लसीकरण आतापर्यंत करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या