१ लाखाहून अधिक नागरिकांची मुंबईत मोफत कोरोना चाचणी

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं कंबर कसली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोरोनापासून बचाव करण्यासाठी महापालिकेनं सुरू केलेल्या नि:शुल्क कोरोना चाचणी केंद्रांत आतापर्यंत सुमारे १ लाखाहून अधिक लोकांनी चाचणी केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं शहर, उपनगरात २४४ ठिकाणी मोफत कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर जलद चाचणी केली जात आहे.

एक लाखाहून अधिक लोकांनी कोरोनाची चाचणी मोफत करून घेतली आहे. या तपासणीत केवळ २ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्यांना संसर्ग झाला आहे अशा रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यात येत आहेत. सध्या मुंबईत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अन्य राज्यांतून मुंबईत येणाऱ्या लोकांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. याशिवाय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती मिळते.

मुंबईत दिवसभरात कोरोनाचे १ हजार ९२ रुग्ण आढळले असून, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार ५७२ इतकी झाली आहे. शनिवारी १ हजार ५३ रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत २ लाख ५१ हजार ५०९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १२ हजार ३९७ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ टक्क्यांवर पोहोचलं असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २८० दिवसांवर पोहोचला आहे.

२ दिवसांपूर्वी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३१० दिवसांवर होता, त्यात घट झाल्याचं दिसून आले आहे. १४ ते २० नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील एकूण कोरोना वाढीचा दर ०.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहर, उपनगरात आतापर्यंत कोरोनाच्या १७ लाख ५७ हजार ६६६ चाचण्या झाल्या आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या