ठाणे जिल्ह्यासाठी ५ नव्या कोरोना चाचणी केंद्राची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी केली. बदलापूर, अंबरनाथ-उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण अशा ५ विभागांसाठी चाचणी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. बदलापूर दौऱ्यावर आलेल्या राजेश टोपे यांनी ही घोषणा केली. ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिकांना अहवालासाठी मुंबईतील चाचणी केंद्र आणि लॅबवर अवलंबून रहावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंबरनाथ, बदलापूर या शहरांमधील कोरोना संशयित रुग्णांचे चाचणी अहवाल येण्यास विलंब लागत होतं. त्यामुळे संशयितांच्या जीवावर बेतत होतं. हे रोखण्यासाठी येत्या दहा दिवसांत अंबरनाथ, बदलापूर या शहरांबरोबरच भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर आणि जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागासाठी पाच चाचणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.
ठाणे जिल्ह्य़ातील करोनाचा वाढता फैलाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढाव्यासाठी आरोग्यमंत्री टोपे यांनी गुरुवारी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेत, प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे, पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार, पालिकांचे मुख्याधिकारी आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.