इमाननं घटवलं दोन महिन्यात 242 किलो वजन!

500 किलो वजन असणाऱ्या इमानने गेल्या दोन महिन्यात जवळपास 242 किलो एवढं वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वी 36 वर्षीय इमानवर बॅरिअॅट्रिक सर्जरी करून तिचे वजन 500 वरून 380 किलोवर आणण्यात आले होते. गेल्याच महिन्यात तिच्या पोटाकडच्या भागावर सर्जरी करून त्या भागातले 75 टक्के वजन घटवण्यात आले होते. 

इमानला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक विकार जडले आहेत. तसंच इमानमध्ये जन्मतःच जनुकीय दोष असल्याचे समोर आले आहे. सैफी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या इमानच्या लठ्ठपणामागील नेमके कारण शोधण्यासाठी तिच्या काही जनुकीय चाचण्याही करण्यात आल्या. यात इमानच्या शरीरातील एलईपीआर आणि लेप्टीन हे जीन तिच्या वजनवाढीला कारणीभूत ठरत असल्याचं उघड झालं आहे. या जीनमुळे भुकेवर नियंत्रण मिळवता येत नाही. त्यामुळे अतिखाल्ल्याने वजन वाढते.

इमानच्या बाबतीतही तसेच घडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पण, गेल्या दोन महिन्यात इमानने दिलेल्या प्रतिसादामुळे तिचे अर्धे वजन घटले आहे. तसंच लवकरच हे वजन आणखी कमी करण्यात येईल असे, डॉक्टर मुफ्फझल लकडावाला यांनी सांगितले. 'तिची उजवी बाजू अर्धांगवायूग्रस्त आहे. 3 वर्षांपूर्वी तिला झालेल्या पक्षाघातामुळे तिला अधूनमधून झटके येतात. यासाठी लवकरच तिच्या मेंदूचे सीटी स्कॅन करण्यात येणार आहे,' असे सैफी रुग्णालयाकडून तिच्या आरोग्याविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

11 फेब्रुवारीला इमानला इजिप्तहून खास विमानातून मुंबईत आणण्यात आलं होतं. त्या दिवसापासून आतापर्यंत तिच्यावर सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वजन घटवण्यासाठी सुरुवातीला डॉक्टरांनी इमानच्या शरीरातील पाणी काढले. पण या प्रक्रियेदरम्यान तिला अशक्तपणा येऊ नये म्हणून लिक्विड डाएट सुरू करण्यात आला होता. याशिवाय तिला फिजिओथेरपीही दिली जात आहे. आता ती स्वतःच बेडवर उठून बसत असून, लवकरच स्वतःच्या पायावर चालू शकेल. तसेच इमानला घरी सोडण्याबाबत अद्याप काही ठरवले नसून तिचा उपचारांना प्रतिसाद पाहून हा निर्णयही लवकरच घेतला जाईल.

पुढील बातमी
इतर बातम्या