Coronavirus Updates: कोरोनाच्या तपासणीसाठी कल्याण-डोंबिवलीत स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली शहरांत स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालयात पाठवावे लागत आहेत. 

या ठिकाणाहून रुग्णांचे अहवाल येण्यास वेळ लागत असून रुग्णांवर उपचार करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या स्व्ॉबची शहरामध्येच तपासणी करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी या प्रयोगशाळेस निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाबाधितांची संख्या १०८ झाली आहे. तसंच, कोरोनाच्या संशयितांमध्ये भर पडत आहे. काही दिवसांपूर्वी पालिका क्षेत्रात एका खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेला करोनाची चाचणी करण्यात परवानगी देण्यात आली आहे. मात्र, तेथील तपासणी शुल्क अधिक असल्याने सर्वसामान्य रुग्णांना ते परवडणारे नाही. 

या अडचणी सोडविण्यासाठी कोरोना तपासणीची स्वतंत्र वैद्यकीय प्रयोगशाळा उभारावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यावेळी या पाठपुराव्याला यश आले असून शहरात स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या