जे. जे. हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन!

  • भाग्यश्री भुवड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

शहेनशाह अमिताभ बच्चन मुन्नाभाई एमबीबीएससारखा वागतोय! आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण हा खराखुरा अमिताभ बच्चन नसून ते आहेत जे. जे. रुग्णालयातले मुन्ना उर्फ रविदास बाबू मोलेश्री हे सफाई कामगार!

आता त्यांचा आणि अमिताभ बच्चन, मुन्ना भाई एमबीबीएसचा काय संबंध? तर रविदास मोलेश्री उर्फ मुन्ना हे अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन आहेत. शिवाय त्यांची चेहेरेपट्टीही अमिताभ बच्चन यांच्याशी मिळती-जुळती आहे. त्यामुळे रुग्णालयातले सर्वजण त्यांना अमिताभ बच्चन म्हणूनच ओळखतात.

गेल्या 30 वर्षांपासून मी जे. जे. रुग्णालयात काम करतोय. त्यातून वेळ काढून मी छोटे-मोठे शो सुद्धा करतो. यादरम्यान मी 15 वर्ष बारमध्येही परफॉर्मन्स करत होतो. माझ्या कलेच्या माध्यमातून मी लोकांचं मनोरंजन करतो.

रविदास बाबू मोलेश्री, नकलाकार

54 वर्षांच्या मुन्ना यांना अभिनयाचा छंद आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासारखा हुबेहूब वेश परिधान करुन ते उत्तम नक्कल करतात. शिवाय आपल्या संवादांनी रुग्णालयातल्या रुग्णांचं मनोरंजनही करतात. त्यामुळे किमान काही वेळापुरतं का होईना, रुग्ण त्यांचं दु:ख, आजार विसरुन त्यांच्यासोबत हसू लागतात.

मी माझ्या मित्रासोबत इथे कामाला लागलो. जे.जे रुग्णालयात येत्या 2 तारखेला माझा पहिला शो होणार आहे. तसंच 29 तारखेला बोरीवलीलाही माझा शो आहे. आता वय झालंय. जोपर्यंत काम करतोय, तोपर्यंत शो करणार. नवीन कलाकार खूप आले आहेत. पण, तेवढी उत्सुकता त्यांच्यात दिसत नाही.

रविदास बाबू मोलेश्री, नकलाकार

आपल्या हसवण्याच्या कलेने रविदास बाबूंनी रुग्णालयातील सहकाऱ्यांसह रुग्णांना देखील आपलंस केलंय. म्हणून रुग्णालयातील सर्वांनीच त्यांना मुन्ना उर्फ अमिताभ बच्चन असं नाव दिलंय.

मुन्ना यांच्या या विशेष कलागुणाचं जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना विशेष कौतुक आहे.

मुन्ना बऱ्याच वर्षांपासून इथे काम करतोय. विनोदी व्यक्तिमत्त्वामुळे तो सहज इतरांना हसवतो. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी ओळख नसतानाही त्यांना तो डायलॉग ऐकवून त्यांचं मनोरंजन करतो.

डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे.रुग्णालय


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या