मुसळधार पावसानंतर मुंबईत लेप्टोचे १५ रुग्ण

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, साथीच्या आजारांनीही डोकं वर काढलं आहे. अशातच मुंबईत ऑक्टोबरच्या पहिल्या ११ दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे १५ रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे.

मुसळधार पावसामुळं मुंबईच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं. हे तुंबलेलं पाणी साचून राहात असल्याने लेप्टोच्या रुग्णांचे प्रमाणही हळूहळू वाढत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लेप्टोच्या रुग्णांची संख्या १४, ४५ आणि ५४ अशी उत्तरोत्तर वाढत गेली आहे. तसेच सप्टेंबरमध्ये एका मृत्यूचीही नोंद झाली आहे. 

मागील वर्षाच्या तुलनेत लेप्टोच्या रुग्णांची आणि मृतांचे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या महिन्यात ३० लेप्टोचे रुग्ण आढळले होते आणि एक मृत्यू झाला होता. परंतु यावर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या ११ दिवसांत निम्मे १५ रुग्ण आढळले आहेत.

जून-जुलैमध्ये शहरात पसरलेल्या मलेरियाच्या प्रादुर्भावात गेल्या काही महिन्यांत घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये मलेरियाचे ६६१ रुग्ण आढळले होते. ऑक्टोबरच्या पहिल्या १० दिवसांत १६० रुग्णांची नोंद झाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या