थंडीत 'असे' जपा तुमचे नाजूक ओठ!

आपले ओठ फुलांच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक असतात हे काही वेगळं सांगायला नको. त्यामुळेच थंडीत शरीरातील इतर अवयवांपैकी ओठांना जास्त त्रास होतो. थंडीत ओठ फाटत असल्याने त्वचेसारखीच ओठांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

वातावरणातील बदलही कारणीभूत

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटंल की, ओठ फाटण्याची समस्या फक्त थंडीतच नाही, तर वातावरणातील बदलामुळंही होते. त्याचप्रमाणे वाढतं वय आणि शरीरात ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता या कारणांनीही ओठ फाटू शकतात.

आहार चांगला ठेवा

यासाठी आहारात ‘ब’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. जसं की, फळे, भाज्या, मासे, अंडी, सुकामेवा, दूध हे पदार्थ आहारात असलेच पाहिजे.

सौंदर्यप्रसाधने वापरताना काळजी घ्या

ओठांवर सौंदर्यप्रसाधन वापरण्यापूर्वी काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण, सौंदर्यप्रसाधनामधील रसायनांमुळे ओठांवरील नाजूक त्वचेला नुकसान पोहोचतं.

अशी घ्या काळजी

  • रात्री झोपताना व्हॅसलिन आणि लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावा, त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
  • सकाळी आणि रात्री दात घासताना ब्रश ओठांवरून अलगद फिरवा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाते.
  • ओठ दाताने कुरतडण्याची सवय टाळा. त्यामुळे ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येतं, यामुळे ओठ राठ आणि कोरडे पडतात.
  • थंडीत ओठांवरची त्वचा अधिक रुक्ष होते, म्हणून रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलाने ओठांवर मसाज करून नंतर सुती कपड्याने पुसून घ्या. त्याने ओठ नरम राहण्यास मदत होते.

थंडीत लिपस्टिक लावताना या गोष्टी करा

रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावं.

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा.

त्याचप्रमाणे लिपस्टिक ओठांवर दिर्घकाळ टिकण्यासाठी ती काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून लावा.

पुढील बातमी
इतर बातम्या