राज्यात सुरूवातीला कोरोनाचा फैलाव मुंबईत वेगाने होत होता. मात्र, आता मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. पण मुंबई नजीकच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत आहे. ८ जूननंतर राज्यभरात लाॅकडाऊन हटवण्यात आला. मात्र, त्यानंतर या अनलाॅकच्या काळात रुग्णसंख्या वेगाने वाढली. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी या शहरांमध्येही पुन्हा लाॅकडाऊनही लागू करण्यात आला. मात्र, या लाॅकडाऊनचाही फारसा परिणाम नसल्याचं दिसून आलं. लॉकडाऊन असतानाही मुंबईनजीकच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच गेली.
जुलै महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत मिरा-भाईंदरमध्ये कोरोनाचे २६२४ रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईतीलही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लाॅकडाऊन हटवल्यानंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. एका महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ५ हजार ४५५ ने वाढली आहेत.
एका महिन्यात नवी मुंबईतील मृत्यूदर ३.१३ टक्के वरून ३.२६ टक्के झाला आहे. राज्य शासनाने ८ जूननंतर मिशन बिगीन अगेन सुरू केले. अनलाॅक झाल्यानंतर लोक मोठ्या संख्येने बाहेर पडू लागले. मात्र, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे अशी बेफिकीरी लोक दाखवत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे ९ जुलैपर्यंत एका महिन्यात रुग्णसंख्या वेगाने वाढली. ९ जूनला नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ३०६३ होती. तर मृतांचा आकडा ९६ होता. ९ जुलैला रुग्णांची संख्या ८५१८ वर गेली आहे. म्हणजे एका महिन्यात तब्बल ५ हजार ४५५ रुग्ण वाढले आहेत. महिनाभरात रोज सरासरी २०० च्या जवळपास नवे रुग्ण वाढले आहेत. वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबईत लाॅकडाऊन घोषीत करण्यात आला. मात्र, लाॅकडाऊनमध्ये रुग्णांची संख्या वाढतच आहे. १ जुलैला नवी मुंबईत कोरोनाचे एकूण ६८२३ रुग्ण होते. तर २५ जुलैला रुग्णांची संख्या १३ हजार २२० झाली. म्हणजे या कालावधीत नवी मुंबईत रोज सरासरी २५५ रुग्ण वाढले. ठाणे जिल्ह्य़ात २ ते १९ जुलै या लाॅकडाऊनच्या कालावधीत ३२ हजार ९४३ नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, ठाणे ग्रामीण, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. या सर्व शहरांमध्ये २ जुलैपासून १९ जुलैपर्यंत कडक लाॅकडाऊन लागू करण्यात आला. या कालावधीत जिल्ह्य़ातील भाजी मंडई, किराणा दुकाने यांसह सर्वच बाजारपेठा १८ दिवस बंद ठेवण्यात आल्या होत्या. लाॅकडाऊनमुळे रुग्णांची संख्या घटणं अपेक्षित होतं. मात्र, प्रत्यक्षात हाच काळ रुग्णसंख्या वाढीचा दिसून आला आहे.२ ते १९ जुलै रुग्णवाढ
शहर रुग्णवाढ
कल्याण-डोंबिवली ८,९८२
ठाणे ६,५७८
नवी मुंबई ४,६०३
उल्हासनगर ३,५४४
मीरा-भाईंदर ३,२५१
अंबरनाथ १,२४४
बदलापूर १,११९
भिवंडी १,०७३