महायुती सरकारने राज्यातील सर्व आरोग्य योजना एकत्र आणून त्यांचे समन्वयित आणि कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी ‘वॉर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचा उद्देश म्हणजे विविध योजनांचे लाभ एकाच व्यक्तीला पुनः पुन्हा मिळू नयेत आणि शासनाच्या निधीचा योग्य वापर व्हावा.
ही वॉर रूम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार आहे. ही वॉर रूम मुख्यमंत्री सहायता निधी आणि चॅरिटेबल हॉस्पिटल हेल्प डेस्क अंतर्गत कार्यान्वित होईल. चॅरिटेबल हॉस्पिटल हेल्प सेलचे प्रमुख आणि सहाय्यक संचालक तसेच मुख्यमंत्री सहायता निधीचे अधिकारी या टीमचा भाग असतील.
सध्या राज्यातील नागरिकांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार मिळवून देण्यासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना यांचा समावेश आहे. मात्र, सरकारच्या अहवालानुसार काही रुग्णांना एकाच वेळी या एकापेक्षा अधिक योजनांमधून लाभ मिळत असल्याचे आढळून आले.
ही पुनरावृत्ती थांबवून सरकारी निधीची बचत करण्यासाठी सरकारने ही वॉर रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रक्रिया जलद करणे, सर्व आरोग्य योजना एकत्रित करणे आणि गरजू लोकांना वेळेवर मदत मिळवून देणे हा आहे.
जनतेला राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी 1800 123 2211 या सामान्य टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. सर्व चौकशा, तक्रारी आणि योजनांशी संबंधित बाबींचे निराकरण या वॉर रूममध्ये केले जाईल.
मुख्यमंत्री कार्यालयाने या वॉर रूमच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती देखील स्थापन केली आहे.
या समितीत १२ सदस्य असतील आणि त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषध, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कामगार, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास, दिव्यांग कल्याण आणि विधी व न्याय या विभागांचे सचिव समाविष्ट असतील.
हेही वाचा