१५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुले लसीकरणासाठी पात्र

(Representational Image)
(Representational Image)

राज्यभरात केंद्राच्या आदेशानुसार ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. लसीकरणासाठी सुमारे ६० लाख मुले पात्र असून पहिल्या दिवशी ६५० लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. ‘कोविन’मध्ये ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असून मुलांना थेट लसीकरण केंद्रावरही लस घेण्याची सुविधा असणार आहे.

२००७ साली किंवा त्याआधी जन्माला आलेली मुले या लसीकरणासाठी पात्र असणार आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी उपलब्ध असलेल्या केंद्रावर गोंधळ होऊ नये यासाठी मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावीत किंवा सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रांवर मुलांच्या लसीकरणासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करावी अशी सूचना राज्यांना केली आहे.

राज्यात १५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुले या लसीकरणासाठी पात्र आहेत. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३ जानेवारी रोजी राज्यभरात ६५० लसीकरण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना वेगळे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता नाही.

लसीकरणाला मिळालेल्या प्रतिसादानुसार पुढे सत्रांची संख्या वाढविली जाईल. मुलांच्या लसीकरणासाठी ‘कोविन’मध्ये १ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या