केंद्र सरकारने 2020 मध्ये जारी केलेल्या नियमांचे अनेक शाळांकडून पालन होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
या आदेशानुसार, सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स-फॅट, अतिरिक्त साखर किंवा सोडियम (HFSS) जास्त असलेले पदार्थ, कार्बोनेटेड शीतपेये आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड स्नॅक्स यांची शाळेच्या परिसरात विक्री किंवा प्रदर्शन करण्यास पूर्ण बंदी राहणार आहे.
याशिवाय, शाळेपासून 50 मीटरच्या परिसरात अशा खाद्यपदार्थांच्या जाहिरातींनाही बंदी घालण्यात आली आहे.
हा आदेश सरकारी, अनुदानित आणि खासगी अशा सर्व शाळांना लागू असेल. विद्यार्थ्यांना सकस आणि पौष्टिक आहार मिळावा यासाठी शाळांनी आपल्या मेनूमध्ये फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
FDA च्या मते, या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराच्या सवयी विकसित होतील, लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी होईल तसेच शाळांमध्ये पोषणमूल्य असलेल्या अन्नाला प्राधान्य मिळेल.