यकृत, हृदय प्रत्यारोपणाची एकत्रित शस्त्रक्रिया यशस्वी, ५ जणांना जीवदान

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

एका ४० वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे ५ जणांना जीवदान मिळालं आहे. या महिलेच्या अवयवदानामुळे सिल्वासा येथील एका २४ वर्षाच्या तरुणाला नवजीवन मिळालं आहे. या तरुणावर रविवारी मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपणाची एकत्रित शस्त्रक्रिया करण्यात आली, जी यशस्वीरित्या पार पडली.

अशा प्रकारे एकाच वेळी दोन अवयवांवर शस्त्रक्रिया करण्याचा महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न आहे. फोर्टिस रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयशल्यविशारद डॉ. अन्वय मुळे यांनी हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली. तर, यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया डॉ. राकेश राय यांनी केली.

५ जणांना जीवदान

या महिलेने हृदय, यकृत, फुप्फुसे आणि दोन्ही मूत्रपिंड दान केले. सिल्व्हासाचा २४ वर्षीय तरुण हृदय आणि यकृत प्रत्यारोपणासाठी आॅगस्ट २०१७ पासून प्रतिक्षेत होता.

अखेर रविवारी त्याच्यावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. या २४ वर्षीय रुग्णाला हृदय आणि यकृत दान करण्यात आलं, तर, फुप्फुसे चेन्नईला एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. १ मूत्रपिंड आयएनएस अश्विनी कुलाबा रुग्णालयात, तर दुसरे पेडर रोड येथील जसलोक रुग्णालयात पाठवण्यात आलं.

मुलुंड येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेला अचानक मेंदूचा स्ट्रोक झाल्याने आधी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना फोर्टिस रुग्णालयात हलवण्यात आलं.

रुग्णालयाने उपचारानंतर महिलेला ब्रेनडेड घोषित केलं. त्यानंतर त्या महिलेचे अवयव दान करण्याचा निर्णय तिच्या कुटंबियांनी घेतल्याने पाच जणांना जीवदान मिळालं.

पुढील बातमी
इतर बातम्या