कर्करोग रुग्णांसाठी 'माय हेअर फॉर कॅन्सर' उपक्रम

जागतिक कर्करोग दिनानिमित्त 4 फेब्रुवारीपासून रिचफिल आणि नर्गिस दत्त फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या 'माय हेअर फॉर कॅन्सर' या उपक्रमात भारतातील जवळपास 1 हजार स्वयंसेवकानी केस दान केले आहेत. फाऊंडेशनने कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी केलेली ही यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी बुधवारी फाऊंडेशनच्या वांद्रे पश्चिम येथील सभागृहात 5 कर्करोगग्रस्त रुग्णांचा सत्कार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेली अभिनेत्री मनिषा कोईराला आणि फाऊंडेशनच्या विश्वस्त प्रिया दत्त यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रिचफीलचे संस्थापक डॉ. अपूर्व शाह उपस्थित होते.

'माय हेअर फॉर कॅन्सर' या उपक्रमाच्या माध्यमातून रिचफिल आणि नर्गिस दत्त फाऊंडेशन यांनी कर्करोगग्रस्त रुग्णांना 'द अनबिटेबल्स' म्हणून प्रोत्साहित करण्याचा हेतू डोळयांसमोर ठेवला आहे. कर्करोगग्रस्त रुग्ण आपल्याला झालेल्या रोगाचा सामना करताना अनेक वेदना सहन करत असतात. परंतु केमोथेरपी आणि रेडिओथेरेपी दरम्यान केस गळतीमुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. 

परिणामी केस गळतीचा प्रभाव कर्करोगापेक्षा भयंकर आहे असं त्या रुग्णाला वाटू लागल्याने उपचार पद्धती अनेकदा कुचकामी ठरतात. त्यामुळे रुग्ण बरा व्हावा आणि रुग्णांमधील आत्मविश्वास देखील कायम राहावा यासाठी 4 फेब्रुवारी 2017 पासून 'माय हेअर फॉर कॅन्सर' हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत 1 हजार स्वयंसेवकांनी केस दान केले आहेत. आपणही या उपक्रमात सहभागी व्हावे आणि कर्करोग रुग्णांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी केस दान करावेत असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या