मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ७६० रुग्ण, चौघांचा मृत्यू

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. सोमवारी मुंंबईत कोरोनाचे नवीन ७६० रुग्ण आढळले. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. याशिवाय ६३४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढून ०.२२ टक्क्यांवर गेला आहे. 

मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख १९ हजार ८८८ झाली आहे. तर आतापर्यंत ३ लाख १८० (९४ टक्के)  रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईती सध्या ७३९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ४८५१ रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर  २४९ रुग्णांना लक्षणे आहेत. २७६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

रविवारी मुंबईत १३ हजार ३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सहा टक्कय़ांहून अधिक अहवाल सकारात्मक आले आहेत. आतापर्यंत ३१ लाख ४६ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ३२१ दिवसांपर्यंत खाली आला आहे. मुंबईत मुलुंड, वांद्रे, चेंबूर, वडाळा, शीव, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, ग्रँटरोड, भांडुप, देवनार या भागात रुग्णवाढ सर्वात अधिक आहे. पालिकेने एका रुग्णामागे १५ संपर्क शोधण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या