डोंबिवलीतल्या 'त्या' लग्नात हजर राहणाऱ्यांची चौकशी होणार

डोंबिवलीतील म्हात्रेनगर इथं १८ मार्च रोजी हळद तर जुनी डोंबिवली ग्राऊंड इथं १९ मार्च रोजी विवाह समारंभ पार पडला होता. या समारंभात एक NRI तरुणही उपस्थित होता ज्याला कोरोनाची लागण झाली होती. या लग्न समारंभात महापौर आपल्या पतीसह अनेक नगरसेवकही उपस्थित होते. लग्नाला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे या लग्नातून कोरोनाचा जास्त संसर्ग पसरण्याचा संशय व्यक्त होत आहे.

चौकशी होणार

आता डोंबिवलीमधल्या या लग्नात उपस्थित असलेल्यांची चौकशी होणार आहे, असा इशारा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. या लग्नातूनच जिल्ह्यात कोरोना विषाणूचा जास्तीचा प्रसार झाला आहे. परदेशात आणि धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या नागरिकांनी खरी माहिती प्रशासनाला दयावी, असं आवाहन देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

'यांच्या'मुळे पसरला कोरोना?

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. डोंबिवलीमध्ये 'त्या' झालेल्या लग्नात उपस्थित असलेल्यांची आता चौकशी होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. कल्याण-डोंबिवलीत कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय साहित्य करता निधी दिला जाईल आणि तो कमी पडणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

बैठकीला कोकण विभाग आयुक्त शिवाजी दौड, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, तहसीलदार दीपक आकडे,खासदार श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजू पाटील आदी जण उपस्थित होते.

रुग्णांच्या आकड्यात वाढ

दुसरीकडे राज्यात कोरोनाबाधित ८८ नव्या रुग्णांची नोंद झाला आहे. एकूण रुग्ण संख्या ४९० वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे,. त्यातील ५४ रुग्ण मुंबई येथील असून ९ जण अहमदनगरचे ,११ पुणे येथील आहेत. याशिवाय ९ जण मुंबईच्या आजूबाजूच्या क्षेत्रातील आहेत. २ रुग्ण औरंगाबादचे तर प्रत्येकी १ रुग्ण सातारा, उस्मानाबाद आणि बुलढाण्याचा आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या