मुंबईत उन्हाचा पारा वाढलेला असतानाच विक्रोळीकर मात्र, डासांमुळे त्रस्त आहेत. पावसाळ्यापूर्वीच डासांनी विक्रोळीकरांवर हल्ला चढवल्यामुळे त्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. विक्रोळीतील टागोर नगरच्या आसपास कोणताही नाला नाही की, पाणी साचण्याची ठिकाणे नाहीत. तरीही डासांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून, गायी आणि म्हशींकरता आवश्यक असलेले गवत पिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या शेतीमुळेच या डासांचा प्रार्दुभाव वाढत असल्याची बाब समोर आली आहे.
पावसाळा आला की डेंग्यू आणि मलेरियाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करणाऱ्या जनतेला पावसाळ्यापूर्वीच डासांचा सामना करावा लागत आहे. विक्रोळीतील टागोरनगर, भारतनगर, गोदरेज कॉलनी, आयसीआयसीआय आदी भागांमधील जनतेची झोप डासांनी हराम करून टाकली आहे. डासांचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी नियमित धूर फवारणी तसेच औषधांची फवारणी केली जात असली तरीही डासांचा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही.
याबाबत आपण महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये तक्रारी करूनही प्रशासनातील अधिकारी लक्ष देत नाहीत, त्यामुळे आपण याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आयुक्त तरी अनधिकृत गवत पिकवणाऱ्यांना डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देवून कारवाई करतात हेच पाहायचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या गवत पिकवली जाणारी जागा ही एस.टी स्टँडसाठी राखीव आहे. परंतु त्यावर एस.टी स्टँड बनवला जात नसल्यामुळे बाहेरच्या लोकांकडून या जागेचा गवत पिकवण्यासाठी अनधिकृत वापर होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांचे जर तसे म्हणणे असेल तर त्या भागाची पाहणी करून तिथे औषध फवारणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे किटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी स्पष्ट केले.