आता नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • आरोग्य

मुंबई महापालिकेच्या शीव आणि केईएम रुग्णालयानंतर आता नायर रुग्णालयातही नवजात बालकांसाठी मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय रुग्णालयात ‘कांगारू मदर केअर’ ही देखील सुविधा नव्यानं सुरू केली आहे. वेळेपूर्वी प्रसूती झाल्यानं अनेकदा बाळांना अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवण्यात येतं. अशा बाळांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मातेचं दूध न मिळाल्यामुळे जगात सुमारे १६ लाख बालकांचा मृत्यू होतो. यावर मात करण्यासाठी मातृदुग्ध पेढी ही संकल्पना जगभर राबवली जाते. जगभरात ५१७ मातृदुग्ध पेढ्या कार्यरत असून देशात १३ मातृदुग्ध पेढ्या आहेत. यात, मुंबईतील जे. जे., शीव रुग्णालय, राजावाडी आणि केईएम रुग्णालयात मातृदुग्ध पेढी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, जे बाळ आपल्या मातेचे दूध घेऊ शकत नाहीत, अशा बाळांना आपल्याच मातेचं काढलेलं किंवा मातृदुग्ध पेढीतले दूध सर्वात उत्तम आहे.

रोज ३ ते ४ लिटर दुधाची आवश्यकता

विशेषतः ज्या बाळांची आई दूध देण्याजोगी परिस्थिती असते त्यांना दूध मिळतं. पण आई नसलेल्या किंवा आईची प्रकृती ठीक नसलेल्या बाळांना दूध मिळत नाही. अशा बाळांना गायीचे दूध किंवा दुधाची पावडर वापरली जाते. हे दूध चांगले उकळवले जाते. त्यानंतरच दूध थंड करून बाळाला पाजले जाते. या बाळांना दिवसभरात तीन ते चार वेळा दुधाची गरज भासते. त्यामुळे दिवसाला ३ ते ४ लिटर दुधाची गरज भासते. यासाठी आता नायर रुग्णालयातही मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली आहे.

अशी असते प्रक्रिया...

मातृदुग्ध पेढीत अन्य गर्भवती मातांकडून दूध घेऊन ते संकलित केलं जातं. या दुधाची तपासणी, प्रक्रिया केल्यानंतर गरजू नवजात बालकांना ते दिलं जातं. हे दूध अशा बालकांसाठी वापरलं जातं, ज्यांचा या मातांशी कुठलंही नातेसंबंध नसतो.

अनेकदा महिलेची प्रसूती झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच बाळाला दूध पाजावं लागतं. मातेला दूध येत नसल्यानं अशा बाळांसाठी मातृदुग्ध पेढी हा एकमेव पर्याय असतो. या पेढीच्या माध्यमातून अन्य मातांनी दान केलेलं दूध बाळाला पाजलं जातं. रुग्णालयात दर महिन्याला ३२ ते ४൦ अशा महिला असताना त्यांना दूध पुरेशा प्रमाणात येत नाही. त्यामुळे आम्ही रुग्णालयात ही मातृदुग्ध पेढी सुरू केली आहे.

डॉ. सुषमा मलिक, बालरोग विभागा प्रमुख, नायर रुग्णालय

कांगारु मदर केअर सुविधेची सुरुवात

याशिवाय तारखेपूर्वी प्रसूती झालेल्या बाळांना आईपासून दूर म्हणजेच निओनॅटल इंटेसिव्ह केअर युनिट (एनआयसीयू)मध्ये ठेवलं जातं. पण, आता रुग्णालयात 'कांगारू मदर केअर' ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जन्मानंतर बाळाला आईजवळचं ठेवलं जाईल. याकरता रुग्णालयानं सहा नवीन बेड आणि फ्लोटिंग चेअर उपलब्ध करून दिल्या आहेत.

या माता करु शकतात दूध दान

ज्या मातांना अतिरिक्त दूध येतं

ज्या मातेला कुठलाही आजार नाही

अकाली जन्माला आलेल्या बाळांच्या माता

ज्या मातांनी जुळ्या बाळांना जन्म दिला आहे

पुढील बातमी
इतर बातम्या