१०० टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हा कोरोना जालीम उपाय मानला जात आहे. त्यानुसार, सर्वत्र लसीकरण केलं जात आहे. अशातच कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० टक्के मुंबईकरांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य महापालिकेनं गाठलं आहे.

शनिवारी दुपारीपर्यंत एकूण ९२ लाख ३९ हजार ९०२ नागरिकांनी पहिला डोस घेतल्याची नोंद ‘कोविन’ ॲपवर झाली आहे. तर ५९ लाख ८३ हजार ४५२ नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याची माहिती मिळते. लस घेणाऱ्यांमध्ये मुंबईबाहेरील नागरिकांचाही समावेश आहे. मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. १८ वर्षांवरील एकूण ९२ लाख ३६ हजार ५०० लाभार्थी आहेत.

पहिल्या टप्प्यात आरोग्यसेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले, गर्भवती महिला, स्तनदा माता, अंथरुणाला खिळलेले रुग्ण अशा सर्वांचेच लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. या लसीकरण मोहिमेत पालिका आणि सरकारी केंद्रांबरोबरच खाजगी रुग्णालयांनीही मोठे योगदान दिले.

  • १८ वर्षांवरील एकूण लाभार्थी - ९२ लाख ३६ हजार ५००
  • पहिला डोस घेणारे - ९२ लाख ३९ हजार ९०२ (काही मुंबईबाहेरील नागरिकांचा समावेश)
  • दुसरा डोस घेणारे - ५९ लाख ८३ हजार ४५२
  • दुसरा डोस शिल्लक  - ३२ लाख ५३ हजार ४८

प्रभावी लसीकरणामुळं प्रसार नियंत्रणात

सप्टेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात येत होता. नोव्हेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र मधल्या काळात लसीकरण मोहीम थंडावल्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे दोन्ही डोस आता जानेवारी २०२२ च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या