हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी सतत हसत रहा

हसणे हा अनेक रोगांवरील अनोखा आणि रामबाण असा उपाय आहे. मनापासून हसण्याने तणाव कमी होऊन तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. आणि त्याचबरोबर रक्तदाब कमी होऊन हृदय विकाराचा झटका येण्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकत.

जागतिक ह्रदय दिनानिमित्त कोहिनूर हॉस्पिटल तर्फे लाफ्टर थेरपी या विषयावरील ‘लाफ फॉर अ हेल्दी हार्ट’ या कार्यक्रमाचं हृदयरोगाच्या रूग्णांसाठी आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला कोहिनूर हॉस्पिटल मधील कार्डिओलॉजिस्ट तसंच बॉलिवूड अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हीने उपस्थिती दर्शवली.

हसण्याचे अनेक फायदे आहेत, यामुळे केवळ चांगले वाटतच नाही तर त्यामुळे आजार लवकर बरे होण्यासही मदत होते. असे म्हटले जाते की जिथे हास्य आहे तिथे आजार आणि शत्रू कधीच राहू शकत नाहीत. म्हणूनच हृदयरोगावर उपचार करतांना चांगला आहार, व्यायाम आणि आरोग्यपूर्ण हास्याचा एक सुंदर डोस देणे गरजेचं असतं.

अधिक हसल्याने शरीरात आनंद देणारे एन्डॉर्फिन्स नावाचे रसायन निर्माण होत असते. हसण्याने नैसर्गिक रित्या दुखणे कमी होते त्याचबरोबर तणाव निर्माण करणारे क्रॉस्टिसॉल नामक रसायन कमी होते, या रसायनामुळे हृदयरोग, रक्तदाब वाढणे आणि पोट वाढणे अशा तक्रारी वाढू लागतात. म्हणूनच चांगले हसणे असल्यास हृदयरोगापासून केवळ बचावच नव्हे तर यामुळे स्थूलताही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

- डॉ. दिपक शिंदे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, कोहिनूर हॉस्पिटल

शिवाय, आरोग्यपूर्ण हसण्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारते. यामुळे व्यक्तीचा आनंद वाढून तो सामाजिक दृष्ट्या ही आकर्षक होतो असं मतही डॉ.शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या