'माझे कुटुंब माझी जबाबदारी' उपक्रमाला जी/उत्तर विभागात चांगला प्रतिसाद

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी व त्यांना योग्य उपचार मिळावे यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेनं संपूर्ण मंबईत जनजागृती करण्यास सुरूवात केली. दरम्यान मुंबईतील जी/उत्तर विभागात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत असून, येथील डॉक्टरांनी विषेश खबरदारी घेत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.

जी/उत्तर विभागात येणाऱ्या माहिम विभागात डॉक्टर सचिन बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती केली जात आहे. अनेकांनी महापालिकेच्या या मोहिमेत सहभाग घेऊन नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांची तपासणी करत आहेत. मोठी जाहिरात मोहीम हाती घेऊन तसेच सोशल मीडियावरुन जनजागृती करुन 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेबाबत माहिती देत आहेत.

नागरिकांमध्ये लक्षणं आढळल्यास त्यांना जवळच्या रुग्णायात जाऊन तपासणी करण्याच सल्ला दिला जात आहे. तसंच, या मोहिमेत कोरोना संकटापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्याचे सोपे उपाय या मोहिमेतून नागरिकांना सांगितले जात आहेत. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानी असल्यामुळे मुंबईला प्रचंड महत्त्व आहे. 

अशी घ्या काळजी

  • घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येकाने मास्कद्वारे नाक-तोंड झाकून घ्यावे
  • साबण वा लिक्विड सोप आणि पाण्याचा वापर करुन हात धुवा नंतर रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. 
  • सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन घ्या. 
  • स्वच्छ हातांवर ग्लोव्हज घाला. 
  • नाक-तोंड मास्कने झाकून घ्या. नंतर घराबाहेर पडा.
  • लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिका यांनी घराबाहेर पडणे टाळावे
  • २ नागरिकांनी एकमेकांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर राखावे
  • सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही वस्तूला अथवा भिंत, रेलिंग, कठडा, जिना, लिफ्ट, दरवाजा, दरवाजाची बेल यांना स्पर्श करणे टाळा. 
  • आवश्यकतेनुसार स्पर्श केल्यास लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.
  • शक्यतो हातात एक कागद बाळगा आणि त्या कागदाने आवश्यक त्या वस्तूंना स्पर्श करा. नंतर तो कागद कचराकुंडीत टाकून द्या.
  • बाहेरून घरी परतताच कुठेही स्पर्श करण्याआधी हात-पाय, चेहरा, मानेचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि रुमालाने अथवा टॉवेलने कोरडे करुन घ्या. 
  • कोरोना संकट असल्यामुळे शक्यतो सोसायटीच्या आवारात तसेच घरात बाहेरच्यांना प्रवेश देणे टाळा
  • ज्यांना सोसायटीत अथवा एखाद्या घरी प्रवेश देणे आवश्यक आहे अशांचे तापमान तपासा, ताप नसल्यास ऑक्सिमीटरने रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासा.
  • तब्येत स्थिर असल्यास संबंधिताला हात सॅनिटायझरने स्वच्छ केल्यानंतर आणि मास्क व्यवस्थित घालून नाक-तोंड झाकले असेल तरच सोसायटीत प्रवेश द्या.
  • घरी प्रवेश देताना संबंधिताला हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याचे अथवा साबण आणि पाण्याने हात-पाय आणि चेहरा धुण्याचे बंधन घाला.
  • पार्सल आले तर ते सोसायटीच्या आवारात अथवा घराबाहेर एका स्वच्छ ठिकाणी ठेवा.
  • संबंधित वस्तू खाण्याचा पदार्थ नसल्यास त्यावर औषध फवारणी करुन निर्जंतुकीकरण करा नंतरच पार्सल ताब्यात घ्या. 
  • सोसायटीत ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर व्यवस्था करा.
पुढील बातमी
इतर बातम्या