स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीग्रस्त आजारावर नायर रुग्णालयात होणार उपचार

लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अट्रोफी (SMA) या दुर्मिळ आजारावरील उपचाराची सुविधा नायर रुग्णालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे योग्यवेळी उपचार मिळाल्यानं या मुलांना नवजीवन मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुंबईतील नायर रुग्णालयाच्या शतकोत्तर महोत्सवाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त जिनोम सिक्वेसिंग लॅब आणि स्पिनराझा औषधोपचार प्रकल्पाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळीच, नायर रुग्णालयात ‘स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी’ या दुर्मिळ आजारावरावर उपचाराची सुविधा सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.

स्पायनल म्स्क्युलर ॲट्रोफी सारख्या दुर्धर आजारापासून लहान मुलांना वाचवण्याची गरज आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हा कोट्यावधीमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी वेदिका शिंदे या बालिकेचं याच आजारानं निधन झालं. तिला १६ कोटी रुपयांचं इंजेक्शन देण्यात आलं होतं मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत.

भविष्यात या आजारानं लहान मुले दगावू नयेत म्हणून महापलिकेचे डॉक्टर्स अविरत प्रयत्न करत आहेत. त्यावरील औषध भारतात उपलब्ध करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अमेरिकास्थित संस्थेच्या माध्यमातून या आजारावर प्रभावी असणारे महागडे इंजेक्शन रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून सध्या नायर रुग्णालयातील १७ रुग्णांना त्याचा लाभ होईल.

स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी (एस. एम. ए.) हा लहान मुलांमध्ये आढळणारा दुर्मिळ आजार असून त्यातून मुलांचे स्नायू विकसित होत नाहीत. परिणामी, या आजाराने ग्रस्त संबंधीत मुलांना आयुष्यभर विकलांग जीवन जगावे लागू शकते किंवा त्यांचा मृत्यू देखील ओढवू शकतो.

या आजारावरील औषधोपचार अत्यंत महागडे आहेत. ही बाब लक्षात घेता, अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्थित डायरेक्ट रिलिफ या बिगर शासकीय संस्थेनं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी रुग्णांवर उपचार करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

या आजारानं ग्रस्त १७ रुग्णांची निवड आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीनं केली आहे. या १७ रुग्णांना स्पिनराझा हे औषध देण्यासाठी डायरेक्ट रिलिफ ही संस्था सर्व आर्थिक भार उचलणार आहे.

स्पिनराझा औषधाच्या एका डोसची किंमत सुमारे ८७ लाख रुपये इतकी असून पहिल्या वर्षी सुमारे ६ कोटी तर, त्यापुढील प्रत्येक वर्षी ३ कोटी २० लाख रुपये इतका खर्च संपूर्ण आयुष्यभर एका रुग्णाला करावा लागतो. ही आत्यंतिक महागडी उपचार पद्धती सदर निवडलेल्या १७ रुग्णांना पुरवण्यासाठी “डायरेक्ट रिलिफ” ही संस्था महानगरपालिकेला सहकार्य करीत आहे.


हेही वाचा

१६ कोटींच्या लसीनंतरही चिमुकलिची मृत्यूशी झुंज अपयशी

पुढील बातमी
इतर बातम्या