नवी मुंबईत कोविड १९ वॉर रुम सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव तसंच पावसाळ्यात साथीचे रोग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने महापालिकेने मुख्यालयात चौथ्या मजल्यावर सुसज्ज कोविड १९ वॉर रुम तयार केली आहे. आयुक्तांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कोविड १९ वॉर रुममधील कामकाजाचा आढावा घेतला.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने अगदी सुरुवातीपासूनच योग्य पावले उचलली आहेत. टेलिफोनिक संवादाव्दारे ६ लाखाहून अधिक नागरिकांशी संपर्क साधून त्यांची आरोग्यविषयक माहिती ऑनलाईन फॉर्मव्दारे संकलीत करण्यात आलेली आहे. नागरिकांसाठी ०२२ -२७५६७२६९  हा आरोग्य विषयक हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आला असून यावर फोन केल्यास तज्ञ डॉक्टरांचा आरोग्य विषयक सल्ला उपलब्ध होत आहे.

याशिवाय महानगरपालिकेची २३ नागरी आरोग्य केंद्रे तसेच ४ रुग्णालये या ठिकाणी फ्ल्यू क्लिनिक सुरु करण्यात येऊन नागरिकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे व कोव्हीड सदृष्य लक्षणे आढळल्यास महानगरपालिकेच्या चार रुग्णालयात स्वॅब कलेक्शन सेंटर सुरू आहेत. तसेच कोरोना बाधीत मोठय़ा संख्येने आढळले आहेत अशा विभागांमध्ये मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात येत असून ३२ हजाराहून अधिक नागरिकांचे मास स्क्रिनींग करण्यात आलेले आहे.

अशा विविध प्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक कारवाई केली जात असताना याबाबतच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व २३ नागरी आरोग्य केंद्रे आणि ४ रुग्णालये त्याचप्रमाणे विविध ठिकाणी सुरु करण्यात आलेले कोविड केअर सेंटर तसंच खाजगी रुग्णालयात सुरु करण्यात आलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल येथील कामकाजाचे सनियंत्रण करण्यामध्ये कोविड १९ वॉर रुम महत्वाची भूमिका बजावणार आहे.

या ठिकाणाहून क्वारंटाईन नागरिक तसेच पॉझिटिव्ह रुग्ण यावर लक्ष ठेवणे, केंद्र व राज्य सरकारमार्फत दररोज कोरोना संदर्भात प्राप्त होणाऱ्या माहितीचे प्रसारण करणे व त्यावरील योग्य कार्यवाहीबाबत दिशा ठरविणे, शासनाच्या विविध विभागांना दररोज सादर करावयाचे विविध प्रकारचे अहवाल विहीत वेळेत संकलित करून पाठविणे, दैनंदिन परिस्थितीचा आढावा घेऊन कार्यवाहीची रणनीती ठरविणे या दृष्टीने या कोविड १९ वॉर रुमची महत्वाची भूमिका राहणार असल्याचे  महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितलं.


पुढील बातमी
इतर बातम्या