पेशी न जुळताही होऊ शकतं 'बोन मॅरो' प्रत्यारोपण!

ज्या रुग्णांना ल्युकेमिया, लिम्फोमा आणि थॅलेसेमियासारखा रक्ताचा कर्करोग आहे, अशा रुग्णांसाठी 'बोन मॅरो' प्रत्यारोपण ही उपचारपद्धत आहे. या उपचार पद्धतीत रुग्णाला त्याच्याशी जुळणारा 'स्टेमसेल' दाता उपलब्ध झाल्यास रुग्णाला नवजीवन मिळू शकतं. पण, या उपचारपद्धतीत दाता मिळणं कठीण असतं. याच पार्श्वभूमीवर 'स्टेमआरएक्स'मधील 'रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर' डॉ. प्रदीप महाजन यांनी 'क्लिनिमॅक्स प्रॉडिजी सिस्टीम' नव्याने आणली आहे. या नव्या पद्धतीमध्ये पेशी न जुळणाऱ्या दात्याच्या माध्यमातूनही 'बोन मॅरो' प्रत्यारोपण करता येऊ शकतं.

सहज प्रत्यारोपण शक्य

जगभरात ५ हजार पेक्षा जास्त रुग्णांना 'क्लिनिमॅक्स प्रॉडिजी सिस्टीम'चा फायदा झाला आहे. ज्यांना कर्करोग किंवा अनुवांशिक रोग आहे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या तंत्राची मदत होऊ शकेल. याद्वारे सहज प्रत्यारोपण करता येऊ शकतं. या तंत्रामुळं 'अल्टरनेट ट्रान्सप्लांट'चा पर्याय निवडणंही शक्य होणार आहे.

रक्तपेशी पूर्ण जुळल्याशिवाय प्रत्यारोपण करणं शक्य नसतं. पण, या नव्या तंत्रामुळं निम्म्या जुळलेल्या रक्तपेशींचा वापर करून प्रत्यारोपण करता येणार आहे. याने बीएमटी दात्यासाठीची दीर्घ प्रतिक्षा संपेल आणि अनेक जीव वाचू शकतील.

- डॉ. प्रदीप महाजन, रिसर्चर, स्टेम आरएक्समधील रिजनरेटिव्ह मेडिसीन, सेव्हन हिल्स हॉस्पिटल

शिवाय, ही मान्यताप्राप्त जीएमपी-ग्रेड पेशी निर्मिती यंत्रणा आहे. ज्यात टी-सेल या डीएनए इम्युन सिस्टिम सेलची पुनर्रचना करण्यात येते. ही पुनर्रचना केल्यानं या पेशी शरीरातील ट्युमरवर आक्रमण करतात, असंही डॉ. प्रदीप महाजन यांनी स्पष्ट केलं.

सुरूवातीला, भावंडांच्या रक्तपेशी जुळणं आवश्यक होतं. या अटीमुळे परिपूर्ण मॅच मिळणं २५ ते ३० टक्केच शक्य होतं. याचा अर्थ ७०% रुग्णांना दाते मिळत नव्हते. पण, आता नव्या तंत्रामुळे ज्या नातेवाईकांच्या रक्तपेशी ५०% जुळत असतील, तर तेही दाते होऊ शकतील. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध होतील.

- डॉ. सुनील भट्ट, प्रमुख, पेडिअॅट्रिक हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि बोन मॅराे ट्रान्सप्लान्ट विभाग, बंगळुरू

इम्युन पेशींच्या संख्येवर नियंत्रण शक्य

बोन मॅरोमधून स्टेम सेल काढून घेणं दात्यांसाठी वेदनादायक आणि धोक्याचं असतं. त्यांना काही वेळा रक्त संक्रमणाची गरज भासते. या दोन पायऱ्यांचा समावेश असलेल्या पद्धतीत भावंडांच्या रक्तातील स्टेमसेलवर प्रक्रिया करण्यात येते. रक्तातील स्टेमसेल्सचा वापर करणं दात्यासाठीही सोपं असतं आणि डॉक्टरसुद्धा टी सेल्स या कर्करोगाशी लढा देणाऱ्या इम्युन पेशींच्या संख्येवर नियंत्रण ठेवू शकतात, असंही डाॅ. महाजन यांनी सांगितलं.

तसंच, कर्करोग झालेल्या रुग्णांना केमोथेरपी घ्यावी लागते. त्यामुळे त्या पेशींना आणि कर्करोगाशी लढा देणाऱ्या पेशींना अतिरिक्त प्रमाणात सक्रिय होण्यास प्रतिबंध करतात. सीएआर - टी सेल इम्युनोथेरपीमुळे विविध प्रकारच्या कर्करोगांवर आणि संसर्गजन्य रोगांवर उपचार करणं शक्य होऊ शकतं, असंही डॉ. महाजन यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या