आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण (coronavirus) बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली १८ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड सेंटरची संख्या वाढवून तिथेच रुग्णांना ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी कोविड सेंटरची संख्या वाढवण्यात येणार आहे. असं केल्याने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होणार नाही. तसेच सौम्य लक्षणे असेलेल रुग्ण सुपर स्प्रेडर बनून बाहेर फिरत असतात. त्यालाही आळा बसेल, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

मुंबईत (mumbai) आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाचे नवीन १ हजार ५७ रुग्ण आढळले. तर १ हजार ३१२ रुग्ण बरे झाल आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याची रुग्णांची संख्या रोज अधिक आहे.

सोमवारी मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये २६ रुग्ण सहव्याधींनी ग्रस्त होते. मृतांमध्ये ३ रुग्ण ४० वर्षांखालील, १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आणि २६ रुग्ण ६० वर्षांवरील होते. २८ पुरुष आणि २० महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा आता १४ हजार ६७१ झाला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या