नॉन फार्मासिस्ट होणार फार्मासिस्ट?

मुंबई - औषधांच्या दुकानांमध्ये पाच वर्ष काम करणारे नॉन फार्मासिस्टला फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट संघटनेने केंद्राच्या आरोग्य विभागाकडे पाठवल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जगनाथ शिंदे यांनी मुंबई लाइव्हला दिली. तर या प्रस्तावात फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियानेही सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे यापुढे एखादा नॉन फार्मासिस्ट फार्मासिस्ट म्हणून औषध दुकानांमध्ये उभा ठाकला तर आश्चर्य वाटायला नको.

उत्तरेकडील राज्यात फार्मासिस्टची कमरता असल्याने औषध विक्री व्यवसाय अडचणीत आल्याचं म्हणत संघटनेनं हा प्रस्ताव ठेवला. या वरील प्रस्तावानुसार सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत नॉन फार्मासिस्टना औषध विक्री-वितरणाचे परवाने देण्यात येणार आहेत. पण या नॉन फार्मासिस्ट असलेल्या फार्मासिस्टमुळे जनआरोग्य धोक्यात येईल, प्रतिजैविकांचा अतिवापर होईल, गर्भपात, नशेच्या औषधांच्या विक्रीचा काळाधंदा वाढेल, असे म्हणत आता फार्मासिस्ट संघटनांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध करण्यास सुरूवात केली आहे. चार वर्षाच्या अभ्यासक्रमात जे शिक्षण फार्मासिस्ट घेतात ते सहा महिन्यांत कसे देणार असा सवाल महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने केला आहे. एखाद्या नर्सला आपण काही महिन्यांचे प्रशिक्षण देऊन डॉक्टर म्हणून मान्यता दिली तर काय होईल, असा प्रश्न करत असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी या प्रस्तावाला विरोध करणार असल्याची भूमिका मांडली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या