BARC करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा

मुंबईतील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी ‘भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रातील’ (बीएआरसी) शास्त्रज्ञांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आता बीएआरसीनं मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी पाऊल उचलले आहे. या प्लान्टमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५० लिटरचे सुमारे १० सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढत असताना महाराष्ट्राला ऑक्सिजन तुटवड्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, खासदार राहुल शेवाळे यांनी बीएआरसीच्या अधिकारी-शास्त्रज्ञांसोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बीएआरसीने विशेष प्लान्ट तयार करून पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. 

या प्लान्टमधून, प्रत्येकी ५० लिटर ऑक्सिजनचे सुमारे १० सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत. हे सिलेंडर दक्षिण-मध्य मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांना पुरविण्यात येणार असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविण्याची तयारीही बीएआरसीने दाखविली आहे. बीएआरसीच्या प्लान्टसोबत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलाझर्स (आरसीएफ) ने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट उभारला आहे.

बीपीसीएलच्या वतीनेही असाच प्लान्ट लवकरच कार्यन्वित होणार आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून लवकर, दक्षिण-मध्य मुंबई ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येतून मुक्त होईल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. ऑक्सिजन प्लान्ट कार्यन्वित करण्यासोबतच बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी नागरिकांच्या वापरासाठी अद्ययावत असे मास्क तयार केले आहेत. हे मास्क एन ९५ पेक्षाही जास्त सुरक्षित असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच रिमोट बॉडी टेम्परेचर मशीनही बीएआरसीने विकसित केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या