देशातील कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना अधिक चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने केईएम रुग्णालयात ऑन्कोलॉजी नर्सिंगमधील पोस्ट बेसिक डिप्लोमा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा डिप्लोमा कोर्स शैक्षणिक वर्ष २०२५–२६ पासून सुरू होणार आहे. यात 20 विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता असेल. या कोर्सचा उद्देश म्हणजे कॅन्सर रुग्णांसाठी विशेष प्रशिक्षित परिचारिका तयार करून आरोग्यसेवेची गुणवत्ता उंचावणे.
सध्या राष्ट्रीय अवसंक्रामक आजार प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रमांतर्गत (NPCDCS) जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी आणि डे-केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. मात्र, राज्य आरोग्य विभागाच्या अंतर्गत सध्या कोणत्याही प्रशिक्षित ऑन्कोलॉजी नर्सेस किंवा ऑन्कोलॉजी नर्सिंग प्रशिक्षण केंद्रे कार्यरत नाहीत.
ही उणीव दूर करण्यासाठी सरकारने यापूर्वीच केईएम हॉस्पिटल नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये एक वर्षाचा पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
महाराष्ट्र राज्य नर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन बोर्डाने हा कोर्स सुरू करण्यास परवानगी मिळावी म्हणून सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. केईएम हॉस्पिटलची पात्रता तपासल्यानंतर आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाकडून (DMER) सकारात्मक अहवाल मिळाला. सरकारने आता या कोर्सला 2025-26 पासून मंजुरी दिली आहे.
विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, औपचारिक संलग्नता (affiliation) मिळाल्याशिवाय कोणतेही प्रवेश घेऊ नयेत आणि विद्यार्थ्यांची संख्या निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक नसावी. तसेच, भारतीय नर्सिंग कौन्सिलच्या (Indian Nursing Council) निकषांनुसार सर्व पात्र अध्यापन कर्मचारी असणे आवश्यक आहे.
जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) किंवा बी.एस्सी. नर्सिंग पूर्ण केलेल्या नोंदणीकृत परिचारिका या कोर्ससाठी पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात राज्य आरोग्य विभागातील परिचारिकांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर गरज पडल्यास इतर उमेदवारांना CET (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) द्वारे प्रवेश दिला जाईल.
या पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग कोर्सचा खर्च विद्यार्थ्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या शैक्षणिक शुल्कातून भागवला जाईल.
हेही वाचा