कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करा - राजेश टोपे

गुरुवार,११ नोव्हेंबर रोजी, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितलं की, केंद्रानं कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा विचार करावा. त्यांनी केंद्राला लसीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी दोन डोसमधील अंतर कमी करण्यास सांगितलं आहे.

बैठकीत टोपे यांनी मांडविया यांना लसीकरण प्रक्रियेला चालना देण्यासाठी राज्यांमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. या बैठकीला इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य मंत्रीही उपस्थित होते.

कोविड-19 लसीकरणाच्या पहिल्या डोससाठी ३० नोव्हेंबरपर्यंत १००% लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र सरकारनं ठेवलं आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

लसीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 'मिशन कवच कुंडल', 'मिशन युवा स्वास्थ्य' यासारखे कार्यक्रम सुरू केले आहेत. याद्वारे लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करत असल्याचं टोपे म्हणाले. त्यासाठी ते पुजारी, हकीम आणि विविध धार्मिक नेत्यांचीही मदत घेत आहेत.

यापूर्वी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) कोविशील्डच्या दोन शॉट्समधील अंतर कमी करण्याची राजेश टोपे यांची विनंती नाकारली आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पुढील सेरोसर्व्हे फेब्रुवारी २०२२ मध्ये करणार आहे.


हेही वाचा

३० नोव्हेंबपर्यंत राज्यात संपूर्ण लसीकरण ; आरोग्य मंत्री राजेश टोपे

मलबार हिल रोडची पुनर्बांधणी २०२२ च्या पावसाळ्यानंतर सुरू होणार

पुढील बातमी
इतर बातम्या