जे.जे मध्ये रुग्णांचे नातेवाईक करतात कर्मचाऱ्यांचं काम?

डॉक्टरांनी उपसलेली संपाची तलवार म्यान होते ना होते तेवढ्यात अजूनही काही रुग्णालयातील कर्मचारी आणि वॉर्डबॉय आपलं काम नीट करत नसल्याचं समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही बाब समोर आणलीय. आपण सोमवारी काही कामानिमित्त जे.जे. रुग्णालयात गेलो असता रुग्णालय परिसरात आई-वडील आपल्या मुलाला स्ट्रेचरवरुन ओपीडीच्या दिशेने घेऊन जाताना पाहिलं. हा प्रकार आपण मोबाईलमध्ये शुट केला, असा अनिल गलगली यांचा दावा आहे. त्यानंतर अनिल गलगली यांनी रुग्णालयात स्ट्रेचर खेचण्याचं काम रुग्णाचे नातेवाईक करतात, रिक्त पदे भरणार का? असं ट्विट केलं.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना त्यांनी हे ट्विट टॅग केलंय. तसंच रुग्ण आणि डॉक्टर यामध्ये उडणारे खटके आणि वादासाठी हे सुद्धा कारण असून, महाराष्ट्र शासन आणि राजकीय पक्ष लक्ष देत नसल्याचा आरोप करत याची दखल घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी नोंदवलं आहे.

मुंबई लाइव्हनं केला रिअॅलिटी चेक

दरम्यान, अनिल गलगली यांनी ट्विट केल्यानंतर मुंबई लाइव्हने या रूग्णालयामध्ये रिअॅलिटी चेक केले. त्यावेळी तशाच पद्धतीचे चित्र पहायला मिळाले. 

काही नातेवाईक रुग्णांना स्वत: व्हिलचेअरवरून घेऊन जाताना दिसले.

     तर काही नातेवाईक स्वत: स्ट्रेचरवरून रुग्णांना घेऊन जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. 


रुग्णालय प्रशासनाचा मात्र नकार

या आधीही गलगली यांनी असाच एक व्हीडिओ व्हायरल केला होता. ज्यातून त्यांनी जे.जे. रुग्णालयात भूत असल्याचं सांगितलं होतं. त्या व्हीडिओप्रमाणेच आता काढलेला व्हीडिओही चुकीचा असल्याचा डॉ. लहाने यांनी दावा केलाय. दररोज फक्त ओपीडीत 3000 पेक्षा जास्त रुग्ण येतात. त्यामुळे एका वेळेस एवढ्या रुग्णांना सांभाळायला फक्त 37 वॉर्डबॉय आणि काही नर्स असतात. त्यामुळे जर नातेवाईक स्वत: आपल्या रुग्णाला घेऊन येत असेल तर ते चांगलंच आहे. ज्यामुळे नातेवाईकालाही रुग्णाची काळजी घ्यावी लागत नाही. 

- डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय



पुढील बातमी
इतर बातम्या