परदेशात जाणारे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत ७ ठिकाणी लसीकरण केंद्र

परदेशात जाणारे विद्यार्थी, खेळाडू, कर्मचाऱ्यांना मुंबईत 7 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार आहे. सोमवार ते शनिवार या कालावधीत शहरातील सात समर्पित कोविड लसीकरण केंद्रांवर लस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

परदेशात जाण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणं आवश्यक आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणारे खेळाडू, शैक्षणिक किंवा रोजगाराच्या उद्देशाने परदेशात जाणाऱ्यांना लस देण्यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, सेव्हनहिल हॉस्पिटल, विलेपार्ले कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण केंद्र, कूपर हॉस्पिटल, शताब्दी रुग्णालय, राजावाडी रुग्णालय अशा 7 ठिकाणी परदेशात जाणारे विद्यार्थी, कर्मचारी आणि ऑलिम्पिक क्रीडापटूंना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

मुंबईतील कोरोना लसीकरण मोहीम शुक्रवारपासून ठप्प होती. पुरेशा लसींच्या साठ्याअभावी मुंबईतील लसीकरण बंद होते.  तीन दिवसांच्या ब्रेकनंतर सोमवारी पुन्हा लसीकरण सुरु झालं आहे. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत. मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील. रोज कोविशील्ड लसीचे 40-50 हजार डोस मुंबईकरांना दिले जातात. तर कोवॅक्सिन लसीचे 15 हजार डोस दररोज दिले जातात. सध्या कोविशिल्डचे 85 हजार डोस आणि कोवॅक्सिनचे 50 हजार डोस उपलब्ध आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या