ठाण्यात महिलांसाठी महिन्यातून एक दिवस विशेष लसीकरण

ठाण्यात महिलांसाठी महिन्यातून एक दिवस विशेष लसीकरण आयोजीत करण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. 

ठाणे महापालिकेने ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. त्यामध्ये ४ लाख ७७ हजार ५५० पुरूषांचे तर ४ लाख २३ हजार ४८८ महिलांचे लसीकरण झाले आहे. एकूण लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी आहे. महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिम ठेवण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवारपासून करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीच्या साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. 

अनेक गरीब व गरजू महिला या विविध ठिकाणी कामे करत असतात, तसेच अनेकांना कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडावे लागते, त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. तसेच अनेक महिला या गर्दी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर थांबत नाहीत. लसीकरण मोहिमेत महिलांचाही जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी खास महिलांसाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींच्या उपलब्धतेनुसार एक दिवस पार्किंग प्लाझा येथे लसीकरण शिबिर ठेवले जाणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या