खासगी रुग्णालयात उपचार परवडत नाही? धर्मादाय रुग्णालयाच्या मोहिमेत सहभागी व्हा!

खासगी किंवा धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना उपचार घेणं अनेकदा परवडत नाही. अशावेळी पैशाअभावी ते उपचार घेणंही टाळतात. त्यातच अनेक योजनांची माहिती नसल्यानेही बऱ्याचदा उपचार टाळले जातात. त्यासाठीच धर्मादाय आयुक्तांनी येत्या ४ नोव्हेंबरला ‘धर्मालय रुग्णालय रुग्णांच्या दारी’ ही एकदिवसीय मोहीम राबवण्याचं ठरवलं आहे.

धर्मादाय आयुक्तांच्या अख्यत्यारित येणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टर्स रस्त्यावर उतरून गरीब आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करणार आहेत.

कशी असेल मोहीम?

या मोहिमेत मुंबईतील ७६ धर्मादाय रुग्णालयं सहभागी होणार आहेत. ५० खाटा असलेल्या रुग्णालयाला एक रुग्णवाहिका, १०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना ३ रुग्णवाहिका दिल्या जातील. रस्त्याच्या बाजूला रुग्णवाहिका उभ्या केलेल्या असतील. त्यात डॉक्टर्स आणि औषधं उपलब्ध असतील. यात रुग्णालय परिसरातील रस्त्यावर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. जर एखादी व्यक्ती गंभीर आजारी असल्यास त्या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार दिले जातील.

ही आमची पहिलीच मोहीम आहे. रस्त्यावर राहणाऱ्या तसेच गरीब रुग्णांसाठी ही मोहीम आम्ही राबवणार आहोत. बऱ्याचदा रुग्णांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. पण, त्याबद्दल जनजागृती होत नसल्याने रुग्णांना अशा योजनांची माहिती मिळत नाही. म्हणून आम्ही जनजागृती करून ही मोहीम राबवणार आहोत. 

- शिवकुमार डिगे, धर्मादाय आयुक्त

सर्वच रुग्णालये गरीब रुग्णांना बघत नाहीत असं नाही. पण, लोकांमध्ये जागरूकता नसल्याने त्याचा फायदा घेतला जातो, असं धर्मादाय आयुक्तांनी सांगितलं. या मोहिमेत, नानावटी, लिलावती, हिंदुजा, जसलोक, बॉम्बे, कोकीलाबेन, अंबानी या मोठ्या धर्मादाय रुग्णालयांचाही समावेश असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या