लसीच्या दुसऱ्या डोसच्या लाभार्थीसाठी खास २ दिवस लसीकरण

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. मुंबईसह राज्यात नागरिकांचं लसीकरण केलं जातं आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत अडीच लाख नागरिक कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असून यांच्या लसीकरणासाठी पुढील आठवड्यापासून खास २ दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

कोविशिल्डची दुसरी मात्रा ८४ दिवसांनी येत असल्यामुळं एकाच वेळेस मोठ्या संख्येनं दुसरे मात्राधारक लसीकरणासाठी पात्र होतात. परंतु त्या तुलनेत लशींचा साठा त्यावेळी उपलब्ध नसल्यास या नागरिकांना दुसरी मात्रा मिळणे कठीण होते. त्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण खुले झाल्यापासून पहिली मात्रा घेण्यासाठी यांचीच गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्राधारकांना लस मिळणे आणखीनच कठीण झाले आहे. तेव्हा या दुसऱ्या मात्राधारकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यापासून खास दोन दिवस राखीव ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत कोविशिल्डचे अडीच लाख नागरिकांची दुसरी मात्रा घेण्याची नियोजित वेळ झाली असली तरी त्यांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळं या नागरिकांना लस उपलब्ध होण्यासाठी पुढील आठवड्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध झाल्यावर खास २ दिवस केवळ दुसऱ्या मात्रेच्या नागरिकांचे लसीकरण आयोजित केलं जाणार आहे.

जेणेकरून एकावेळेस ५० हजार किंवा त्याहून अधिकप्रमाणे दोन आठवड्यात या सर्वांना लस मिळू शकेल, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

प्राप्त झालेला साठा लवकरात लवकर संपवून पुढील साठा येण्याची वाट पाहणे हे पालिकेने स्वीकारलेले धोरण चांगलेच पथ्यावर पडले आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये पालिकेला ९ लाख ९६ हजार ८६० लशींचा साठा प्राप्त झाला असून आतापर्यंत आलेला सर्वाधिक साठा आहे. मिळलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये लससाठा मोठय़ा प्रमाणात मिळाल्यामुळे ९ लाख ४७ हजार ८२० जणाचे लसीकरण झाले आहे. यात सर्वाधिक ६,५४,९५९ जणांनी पहिली मात्रा घेतली आहे, तर २,९२,८६१ जणांना दुसरी मात्रा मिळाली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या