'निपाह' व्हायरस अलर्ट: कस्तुरबा रुग्णालयात विशेष वाॅर्ड

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • आरोग्य

केरळमध्ये थैमान घातल्यानंतर 'निपाह' व्हायरसने देशभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या व्हायरसने केरळच्या कोझीकोडे जिल्ह्यात तब्बल १० जणांचा बळी घेतल्याने देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. महाराष्ट्रात खासकरून आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत या व्हायरसनं शिरकाव करू नये म्हणून विशेष दक्षता घेतली जात असून जेकब सर्कलजवळील कस्तुरबा रुग्णालयात या व्हायरसवरील उपचारांसाठी विशेष वाॅर्डचीही सोय करण्यात आली आहे.

काय म्हणाले आरोग्यमंत्री?

'निपाह' व्हायरससंदर्भात देशभरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उपाय-योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री दीपक सावंत म्हणाले, ''हा व्हायरस कसा पसरतो? या व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणं काय आणि त्यावर काय उपचार घ्यावेत? याची माहिती देणारी जनजागृती मोहीम लवकरच आरोग्य विभागाच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. शिवाय प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुठलाही संशयास्पद रुग्ण आढळून आल्यास त्यावर त्वरीत उपचार करण्यात येतील. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही''

कसा पसरतो व्हायरस?

पुण्यातील नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीनं ३ नमुन्यांची तपासणी केल्यानंतर तो 'निपाह' व्हायरस असल्याची घोषणा केली. त्यामुळे पुणे, मुंबईसह देशभरात खबरदारी घेण्यात येत आहे.

मुंबईत काय उपाययोजना?

मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात एक 'आयसोलेशन वार्ड' तयार करण्यात आला आहे. हा वाॅर्ड अगोदर एच-१ एन-१ व्हायरसकरता राखून ठेवण्यात आला होता. मुंबईत कुठल्याही रुग्णालयात 'निपाह' व्हायरसने बाधीत संशयास्पद रुग्ण आढळून आला, तर या रुग्णावर या वाॅर्डमध्ये उपचार करण्यात येतील. येथील प्रशिक्षित डाॅक्टर आणि नर्स या रुग्णावर चाचण्या करून रुग्णावर उपचार करतील.

जे व्यक्ती केरळला जाऊन आले असतील, त्यांचीही वैद्यकीय चाचणी करण्याचं, यापैकी कुठल्याही व्यक्तीमध्ये 'निपाह'ची लक्षणं आढळून आल्यास त्याला सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्याचे निर्देश दिल्याचं डॉ. सावंत यांनी सांगितलं.


हेही वाचा-

निपाह व्हायरसमुळे मुंबईसह पुण्यात अलर्ट


पुढील बातमी
इतर बातम्या