सेवन हिल्सच्या जागी कँसर रुग्णालय सुरू करा - रवींद्र वायकर

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

अंधेरीमधील सेवन हिल्स रुग्णालयाची जागा मुंबई महानगरपालिकेची आहे. सध्या हे रुग्णालय जवळजवळ बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महापालिकेने ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी कॅन्सर रुग्णालय सुरू करावं, असं मत गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मांडलं. गुरुवारी जोगेश्वरीतील ट्रामा रुग्णालयात ‘नो टोबॅको डे’ निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बुधवारी महापालिका आयुक्तांसोबत मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीतही राज्यमंत्री वायकर यांनी तशी सूचना केली होती. त्याला आयुक्तांनी तत्वता मान्यताही दिली.

जनतेला याचा लाभ घेता येईल

मुंबईत कॅन्सवर उपचाराठी टाटा हे एकमेव रुग्णालय आहे. दरम्यान या रुग्णालयावर जास्त ताण पडत आहे. सेवन हिल्स रुग्णालयाला देण्यात आलेली जागा ही महापालिकेची आहे. सध्या हे रुग्णालय बंद अवस्थेत आहे. त्यामुळे महापालिकेने आपली जागा ताब्यात घ्यावी. त्याच ठिकाणी उपनगरामध्ये कॅन्सरसाठी रुग्णालय सुरू केल्यास उपनगराबरोबरच राज्यातील जनतेला याचा लाभ मिळू शकतो. शिवाय टाटा कॅन्सर रुग्णालयाचा भारही काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल, असं मतही वायकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं.

'प्रस्ताव आयुक्तांना पाठवा'

उपनगरातील जनतेसाठी महापालिकेचे ट्रामा हे मुख्य रुग्णालय असून येथे डॉक्टरांच्या भरतीबरोबरच, एनआसीयू, डायलिसीस सेंटर, कार्डिओलॉजिस्ट विभाग, पिडीयाट्रीक वॉर्ड, ओ.टी.पी.टी विभाग, निरोलॉजी विभाग, एस.आय.सी.ओ, आदी विभाग सुरू करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. त्यानुसार याबाबतचे प्रस्ताव तयार करून ते महापालिका आयुक्तांना पाठवण्यात यावं, अशी सूचनाही वायकर यांनी यावेळी संचालक सुपे यांना दिली. 

आयुक्तांसोबत झाली चर्चा

ट्रामा रुग्णालयाला लागूनच जोगेश्‍वरीकरांसाठी स्वतंत्र महापालिकेचं विभागीय कार्यालय सुरू करण्यासंदर्भातही आपण प्रयत्नशील आहोत. तशी चर्चाही आयुक्तांबरोबर झाली असून तसा प्रस्ताव पाठवण्याचे आदेश महापालिकेचे उपायुक्त वाघ्राळकर यांना दिले असल्याची माहिती वायकर यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या