'या' राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक

दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दिल्ली पाठोपाठ आता मुंबईसह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र सरकारनं नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलत महाराष्ट्र - दिल्ली प्रवासावर निर्बंध आणले आहेत.

महाराष्ट्राच्या सीमांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहेत. तसंच, दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात या राज्यांतून ट्रेन किंवा विमानानं येणाऱ्या प्रवाशांकडे कोरोनाचे चाचणीचे अहवाल असणं अनिवार्य असणार आहे. शिवाय, प्रवाशांनी केलेल्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे.

राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीत रेल्वे, विमान आणि रस्ते प्रवासासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. या नव्या नियमानुसार, राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या राज्यातून हवाई मार्गानं महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी जवळ आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल जवळ बाळगणे आवश्यक आहे. मात्र, हा अहवाल ७२ तासांमध्ये करण्यात आला असावा, असंही या नियमावलीत नमूद केलं आहे.

जर, प्रवाशांकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसेल तर, विमानतळावर स्व खर्चानं कोरोनाची टेस्ट करण्यात यावी. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरंच, प्रवाशांना विमानतळा बाहेर जाता येणार आहे. अन्यथा, प्रवाशांना त्यांच्या राज्यात पुन्हा परतावे लागणार आहे. त्याचबरोबर, प्रवासी रेल्वे मार्गानं महाराष्ट्रात येत असतील तर त्यांनी आरटीपीसीआर टेस्ट मागील ९६ तासांमध्ये केलेली असली पाहिजे.

ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.. तसंच, रस्ते मार्गानं प्रवासी येत असल्यास राज्याच्या सर्व सीमांवर या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. प्रवाशांमध्ये करोनाची लक्षण आढळली तर त्यांना राज्याच्या सीमेवरुनच परत पाठवलं जाणार आहे. तसंच, प्रवाशांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतील तरच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. असंही या आदेशात नमूद केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या