केंद्र सरकारची हृदयरोगींना 'व्हॅलेंटाइन डे' भेट

मुंबई - हृदयरोगी रूग्णांना केंद्राने 'व्हॅलेंटाइन डे'ची भेट दिली आहे. हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमतीत मंगळवारपासून 85 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. राष्ट्रीय फार्मास्युटिकल दर प्राधिकरणाने कमाल किंमती निश्चित केल्या आहेत. त्यानुसार बायोरिसॉर्बेबल स्टेंट्सची किंमत 30 हजार रुपये, तर बेअर मेटल स्टेंट्सची किंमत 7 हजार 500 रुपयांपर्यंत आकारण्याचं ठरवण्यात आले आहे. 14 फेब्रुवारीपासून नव्या किंमती लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील लाखो हृदयरोग्यांना आता दिलासा मिळाला आहे.

हृदयरोगाचे प्रमाण देशात वाढते आहे. अशावेळी रुग्णांना अॅन्जिओप्लास्टी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशावेळी अॅन्जिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेंटच्या नावाखाली डॉक्टर रुग्णांना लुटत असल्याचे चित्र आहे. स्टेंटची मूळ किंमत 20 ते 30 हजार असताना चक्क 70 हजार ते दोन-अडीच लाखांतही स्टेंट विकले जातात. मात्र आता जे रुग्णालय किंवा डॉक्टर यापेक्षा जास्त किंमती आकारतील त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यानुसार यासंबंधीची जबाबदारी एफडीएची असणार आहे. पण त्याचबरोबर वैधमापन विभागाकडेही तक्रार दाखल करता येणार आहे. त्यामुळे आता रुग्णांची आर्थिक पिळवणूक रोखण्यास तयार व्हावे, अशी आशा आरोग्य चळवळीत काम करणारे कार्यकर्ते उमेश खके यांनी व्यक्त केली.

स्टेंट म्हणजे काय?

स्टेण्ट हे एक वैद्यकीय उपकरण आहे. अॅन्जिओप्लास्टी करताना रक्त वाहिन्यांमध्ये हे उपकरण टाकले जाते. जेणेकरुन रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यास मदत होते.

पुढील बातमी
इतर बातम्या