ठाणे जिल्हा रुग्णालय होणार 'सुपरस्पेशालिटी', ५७४ खाटांचा समावेश

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • आरोग्य

ठाणे जिल्हा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्याजागी ५७४ खाटांचं सुपरस्पेशालिटी रुग्णालय बांधण्यात येणार आहे. येत्या साडेतीन वर्षांत या रुग्णालयाचं काम पूर्ण होईल. तत्पूर्वी तेथील रुग्णसेवा वागळे इस्टेट येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात (ईएसआयसी) हलवण्यात येणार आहे. या ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीचे काम ३ महिन्यांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरूवारी विधानपरिषदेत दिली.

ठाणे जिल्हा रुग्णालयातील गैरसुविधा आणि अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अभाव यासंदर्भातील लक्षवेधी सूचना शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी उपस्थित केली. जिल्हा रुग्णालयाला सुपरस्पेशालिटी करण्याबाबतच्या आश्वासनांचे काय झालं? अशी विचारणा फाटक यांनी केली.

किती खर्च येणार?

यावर उत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, '' नव्या ५७४ खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाला मंजुरी देण्याची कार्यवाही सरकारी स्तरावर सुरू आहे. त्यासाठी अंदाजे १६७.५५ कोटी खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं. नव्या रुग्णालयाचे काम पूर्ण होईपर्यंत ठाण्यातील रुग्णेसवा सुरू राहावी, यासाठी ईएसआयसी रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. ईएसआयसी रुग्णालयाची दुरुस्ती झाल्यानंतर तिथून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलचे काम चालवलं जाईल.''

रुग्णालयाची सुरक्षा वाढवणार

१४ जानेवारी २०१८ रोजी ठाणे रुग्णालयातून नवजात अर्भकाची चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती देताना डॉ. सावंत म्हणाले, ''नियमित सुरक्षारक्षक उपलब्ध होईपर्यंत सध्यात ४ सुरक्षारक्षक नियुक्त करून त्यांच्यामार्फत मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा पुरवली जात आहे. सध्या रुग्णालयात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून येत्या काळात वाढीव कॅमेरे पुरवले जाणार आहेत. आ. फाटक यांच्या आमदार निधीतून तसेच राज्य सरकारच्या निधीतून अंदाजे ५० सीसीटीव्ही लावले जातील.''

पालघर जिल्ह्यासाठी रुग्णालय

पालघर जिल्हा रुग्णालयासाठी मनोरा येथे साडेचार एकर जागा बघण्यात आली असून लवकरच तिथं भूमीपूजन करण्यात येईल, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. पालघरच्या रुग्णांना ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी यावं लागतं. याबाबतचा प्रश्न आ. आनंद ठाकूर यांनी उपस्थित केला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या