शिक्षिकांच्या माणुसकीला 'मुंबई लाइव्ह'चा सलाम !

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • आरोग्य

कुर्ला - सरकारी यंत्रणांमधली माणुसकी कशी संपत चाललीये याचा अनुभव नुकताच कुर्ल्यातल्या पाच शिक्षिकांना आला. कुर्ला स्टेशनजवळ एक वृद्ध महिला विव्हळत पडली होती. कुर्ल्याच्या ऑर्किड स्कूलमध्ये शिकवणाऱ्या अंकिता बोरिचा, रिटा दसरी, किंजल सिंग, वृषाली राऊत आणि रिंकी देवी या शिक्षिकांनी तिला पाहिलं आणि पोलिसांची मदत मागितली. मात्र ही रेल्वेची हद्द असल्याचं सांगत पोलिसांनी टाळाटाळ केली.

पोलिसांकडून मदत न मिळाल्याने या पाचही जणींनी समोरच उभ्या असलेल्या अँम्ब्युलन्सकडे धाव घेतली. मात्र कंट्रोल रुमकडून सांगितल्याशिवाय गाडी काढणार नसल्याचं कारण सांगण्यात आलं. कंट्रोल रुमशी संपर्क केल्यानंतर ही गाडी बंदच असल्याचं स्पष्ट झालं. तब्बल दीड तासानंतर अखेर अँम्ब्युलन्स आली. पण रुग्णालयातही संबंधित महिलेला दाखल करून न घेता फक्त वरवरची मलमपट्टी करण्यात आली. मोबाइलवर शूटिंग केल्यानंतर या महिलेला दाखल करून घेण्यात आलं.

सध्या या महिलेवर शीव येथील टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेची तब्येत सुधारल्यानंतर तिला वृद्धाश्रमात भरती करणार असल्याची माहिती या शिक्षिकांनी दिली. सध्याच्या बदलत्या काळात जिथे माणसातली माणुसकी संपत चाललीये, तिथे या शिक्षिकांनी एका अनोळखी महिलेसाठी दाखवलेल्या या माणुसकीला मुंबई लाइव्हचा सलाम...

पुढील बातमी
इतर बातम्या